Bhondla And Bhondla Songs भोंडला भोंडल्याची गाणी

भोंडल्याची गाणी Bhondla And Bhondla Songs in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

आजचा आपला विषय आहे भोंडला. Bhondla And Bhondla Songs

कदाचित भोंडला हे नाव आपल्यापैकी बर्‍याच जणांनी ऐकलं नसेल.  तर बऱ्याच जणांच्या आपल्या बालपणातील भोंडल्याच्या सुखद आठवणी असतील.

भोंडला हा कमी वयातील मुलींसाठी नवरात्रातील नऊ दिवस खेळला जाणारा एक प्रकार आहे. संध्याकाळी आसपासच्या परिसरातील मुला-मुलींना, बायकांना भोंडलासाठी आमंत्रित केले जाते. याप्रमाणे गुजरात मध्ये नवरात्रातील नऊ दिवस गरबा खेळला जातो. त्याप्रमाणे महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी भोंडला खेळला जात असे.

भोंडल्याची विविध गाणी फेर धरून म्हंटले जाते. फेरच्या मधोमध हत्तीची मूर्ती एका पाटावर ठेवली जाते. पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढतात. एक गुप्त खाद्यपदार्थ म्हणजेच खिरापत होय.

सगळ्यांनी ती खिरापत ओळखायची. नंतर अंगणातच एकत्र बसून ती खाण्याचा आनंद घ्यायचा. भोंडल्याच्या गाण्यांप्रमाणे हात पाय आपटणे, एकमेकांना बुक्की मारणे, कानामध्ये ओरडणे असे विविध गत विधी असतात. ज्यामध्ये जाम मज्जा येते. 

आता भोंडला ही संस्कृती विरळ आहे किंवा लुप्त होत चालली आहे.

वाड्याच्या आठवणीतील भोंडला Memories of Bhondla at Wada in Marathi

लहानपणी आम्ही जिकडे रहायचो तिकडे वाडा पद्धत होती. प्रत्येक वाड्यात नवरात्रीचे नऊ दिवस भोंडला साजरा केला जात असे. नवरात्रीतील नऊ दिवस खूप व्यस्त जायचे.

 • प्रत्येक दिवस एक वाड्याचा भोंडला ठरलेला असायचा.
 • खिरापत आपल्याच वाड्याची सर्वोत्कृष्ट व्हावी ही अपेक्षा प्रत्येकाची असायची.
 • वाड्यातील बहुदा प्रत्येक घर (7-8) एक गुपित खिरापत ठेवायचे.
 • नवरात्रीतील नऊ दिवस रात्रीचे जेवण खिरापती वरच भागायचे.
 • जणू प्रत्येक वाडा परिसरातील मुलांना, बायकांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करायचा.

हा अनुभव शब्दात मांडणे अशक्य आहे. 

भोंडला हा भुलाई व हादगा या नावाने देखील ओळखला जातो.

खिरापतीचे प्रकार Types of Khirapat in Marathi

खिरापत म्हणजे भोंडला साठी केला जाणारा गुपित खाद्यपदार्थ.

खाली दिलेले पदार्थ मी लहानपणी खूप आनंदाने खाल्लेले आहेत. आपल्या घरात कितींदा एखादी वस्तू बनू देत ना पण दुसऱ्याने केलेली वस्तू चव जगात भारी असते.

 • पोहे/ दडपे पोहे/ पोह्यांचे प्रकार
 • भेळीचे प्रकार
 • राजगिरा लाडू, चिक्की
 • खवा पोळी/ गुळपोळी
 • पुरी भाजी/ पालक पुरी
 • मसाले भात
 • तळणीचे पदार्थ इत्यादी

लहानपणी आम्ही न ओळखलेली खिरापत म्हणजे बॉबी आणि लोणचं. आम्ही हा विचारच करू शकलो नाही बोबडे आणि लोणचं सुद्धा खिरापती असू शकतं. ही गोष्ट मला आजही स्पष्ट आठवते.

भोंडल्याची गाणी Bhondla And Bhondla Songs in Marathi

भोंडल्याची गायली जाणारी एकूण सोळा गाणी आहेत. त्यापैकी  काही प्रसिद्ध आणि मजेशीर गाणी आम्ही म्हणत असलेली मी इथे लिहीत आहे.

या गाण्यांमध्ये एकमेकांना चिडवणे, सासूला व ननंद बाईंना नावे ठेवणे अशा गमतीजमती असतात.

भोंडल्याची पहिलं गाणं व शेवटच गाणं हे निश्चित असतं.

ऐलोमा पैलोमा Bhondla Song 1 in Marathi

ऐलोमा पैलोमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारव घुमतय पारावरी

गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या भुलोजी बायका

एवीनी गा तेविनी गा 

आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दूधोंडे

दूधोंड्याची लागली टाळी (टाळी वाजवायची),

आयुष्य दे रे भामाळी, पाळी गेला येता भाता

पाऊस पडला येता जाता, पड पड पावसा थेंबोथेंबी, 

थेंबोथेंबी आडव्या लोंबी, आडव्या लोंबती अंगणा,

अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे,

अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या ,

चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे

एक एक गोडा विसाविसाचा सारा नांगर नेसायचा

नेसा ग नेसा बाहुल्यांनो अडीच वर्ष पावल्यांनो.

शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी Bhondla Song 2 in Marathi

ननंद भावजय दोघीजणी

घरात नव्हतं तिसरं कोणी

शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी 

मी नाही खाल्लं वहिनींनी खाल्लं

आता माझा दादा येईल ग

दादाच्या मांडीवर बसेन ग

दादा तुझी बायको चोरटी

असेल माझी गोरटी

घे काठी घाल पाठी

घरा घराची लक्ष्मी मोठी

(ननंद भावजय यांची थट्टामस्करी)

कृष्ण घालितो लोळण Bhondla Song 3 in Marathi

कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली धावून

काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून || धृ ||

आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं ||1||

कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली ग धावून… ||धृ||

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून

असलं रे कसलं मागणं तुझ्या जगाच्या वेगळं

कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली धावून..||धृ||

आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं 

कृष्ण घालितो लोळण, यशोदा आली ग धावून…  ||धृ||

श्रीकांता कमलकांता Bhondla Song 4 in Marathi

श्रीकांता कमलकांता असे कसे झाले

असे कसे झाले माझ्या नशिबी आले

वेड्याच्या बायकोने केले होते लाडू 

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले.

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेड्याच्या बायकोने केले होते चिवडा

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकले….

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

होड्या, होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या…

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या…

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले…

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या…

(पुना श्रीकांत …..म्हणायचं)

वेड्याची बायको झोपली होती

तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले

मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले..

(नेहमीच नवर्याची स्तुती करत असलेल्या बायकोला चिडवत हे गाणे मैत्रिणी म्हणायच्या)  

पाचा लिंबांचा पाणोठा Bhondla Song 5 in Marathi

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू

दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू

तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू

चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू

पाचा लिंबांचा पाणोठा

माळ घाली हनुमंताला

हनुमंताची निळी घोडी

येता-जाता कमळ तोडी 

कमळाच्या पाठीमागे लागली राणी

अगं अग राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुना ची बारीक वाळू

तेथे खेळणी चिलारी बाळू

चिल्लारी बाळाला भूक लागली

सोन्याच्या शिंपी ने दूध पाजले

पाटावरच्या गादीवर निजविले

निज रे निज रे चिल्लारी बाळा 

मी तर जाते सोनार  दादा

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले की नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळी  खाली

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी

अक्कण माती चिक्कण माती Bhondla Song 6 in Marathi

अक्कण माती चिक्कण माती, खड्डा तो खणावा

अस्सा खड्डा सुरेख बाई, जातं ते रोवाव

अस्सं जातं सुरेख बाई, रवा पिठी काढावी

अशी रवा पिठी सुरेख बाई, करंज्या कराव्या

अश्या करंज्या सुरेख बाई,  तबकी भराव्या

अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं

अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा

अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी

अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं

असं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीत

असं आजोळ गोड बाई, खेळायला मिळत

(सुनेने दिलेला टोमणा) 

कारल्याचा वेल Bhondla Song 7 in Marathi

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||1||

कारल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याचे वेल वाढलं सासुबाई वाढलं सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||2||

कारल्याला फुल येऊदे गं सुने येऊदे गं सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याला फुल आलं हो सासूबाई आलं हो सासूबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||3||

कारल्याला कारलं येऊदे गं सुने येऊदे गं सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याला कारल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||4||

कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||5||

आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने

मग जा आपल्या माहेरा माहेरा

आपलं उष्ट काढलं सासुबाई काढलं सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ||6||

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा||7||

(पूर्वीच्या काळी वारंवार विचारूनही सासू सुनेला माहेरी पाठवत नसे म्हणून सासु सुना ना चिडवण्यासाठी हे मजेशीर गाणे)

सासरच्या वाटे कुजबुजू काटे Bhondla Song 8 in Marathi

सासरच्या वाटे कुजबुजू काटे आज कोण पाहून आलं ग बाई आलं ग  बाई (हे वाक्य प्रत्येक पाहुण्याच्या आधी गावे)

सासरा पाहुणा आला ग बाई आला ग बाई

सासर्याने काय आणलं ग बाई आणलं ग बाई 

सासर्‍याने आणल्या पाटल्या ग बाई पाटल्या ग बाई (western dresses)

पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही

चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई

झिपऱ्या कुत्र्यांना सोडा गं बाई सोडा गं बाई ई ||1||

ननंद पाहुनी आली ग बाई आली ग बाई

ननंदे नी काय आणलं ग बाई आणलं ग बाई

ननंद नी आणला सोन्याचा हार ग बाई (diamond neckpiece) हार ग बाई

सोन्याचा हार मी घेत नाही सांगा मी येत नाही

चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई

झिपऱ्या कुत्र्यांना सोडा गं बाई सोडा गं बाई ||2||

दीर पाहुणा आला ग बाई आला ग बाई

दिराने काय आणलं ग बाई आणलं ग बाई

दिराने आणला गोठ ग बाई गोठ ग बाई (car)

गोठ मी घेत नाही सांगा मी येत नाही 

चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई

झिपऱ्या कुत्र्यांना सोडा गं बाई सोडा गं बाई ||3||

सासु पाहुणे आली ग बाई आली ग बाई 

सासूने काय आणले ग बाई आणले ग बाई

सासूने आणला राणीहार ग बाई राणी हार ग बाई (holiday package)

राणी हार मी घेत नाही सांगा मी येत नाही

चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई

झिपऱ्या कुत्र्यांना सोडा गं बाई सोडा गं बाई||4||

नवरा पाहुणा आला ग बाई आला ग बाई

नवऱ्याने काय आणले ग बाई आणले ग बाई

नवऱ्याने आणले मंगळसूत्र बाई मंगळसूत्र ग बाई (apple phone + net pack + bank balance)

मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते

चारी दार उघडा ग बाई उघडा ग बाई

झिपरं कुत्रं बांधा ग बाई बांधा ग बाई

(पूर्वीच्या काळाच्या चिडलेल्या सुनेला मनवण्यासाठी केलेले प्रयत्न) माझ्या कल्पनेनुसार सध्याच्या सुनांना मनवण्यासाठी कंसात दिलेले वस्तू बहुधा म्हणाव्या लागतील)

आड बाई आडोणी Bhondla Song 9 in Marathi

आड बाई आडोणी

आडाचं पाणी काडोणी |

आडात पडली सुपारी

आमचा भोंडला दुपारी ||

आड बाई आडोणी

आडाचं पाणी काडोणी |

आडात पडली मासोळी

आमचा भोंडला संध्याकाळी ||

आड बाई आडोणी

आडाचं पाणी काडोणी |

आडात पडली कात्री

आमचा भोंडला रात्री || 

आड बाई आडोणी

आडाचं पाणी काडोणी |

आडात पडला शिंपला

आमचा भोंडला संपला ||

खिरापत आणा 1 Bhondla Song 10 in Marathi

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता पाटा

भुलोजीला लेक झाला, साखर खडी वाटा

बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा,

गाणे संपले खिरापत आणा

खिरापत आणा 2 Bhondla Song 11 in Marathi

फुलात फुल बाई फुल रंजना

माळाच रंग बाई माळ रंजना 

माळ्याने सांडली बीबाळी

आंब्याची फोड गवसेना

हुडकून गेले गवसेना

आंब्याची फोड गवसली

सरपाखाली सापडली 

सर्प म्हणे मी एकुला

डाळी आंबा पेकूला

डाळी आंब्याची फोड ग

खिरापतीला काय ग ?

(खिरापतीला काय ग ? हे ज्याचा भोंडला असतो त्याच्या कानात ओरडतात)

निष्कर्ष Conclusion in Marathi

पूर्वीच्या काळात स्त्रिया घरातून बाहेर निघत नसत. दिवसभराच्या घर कामातून त्यांना मुक्तता नसे. सासरच्यांना काही म्हणजे ही सोय नसे. भोंडल्याच्या निमित्ताने त्या बाहेर निघत असत.

नेहमीच स्वतःच्या हातून बनवलेले जेवण जेवून कंटाळलेल्या स्त्रियांना खिरापती च्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थांचा स्वाद घ्यायला मिळत असत.

गाण्याच्या निमित्ताने  सासरकडच्या मंडळींनी बद्दल असणारा द्वेष काढला जात असत. यामुळे मन मोकळं होऊन मानसिक ताण निघत असत.

आजही आपण हे सर्व खेळ खेळले पाहिजे. हॉटेलमध्ये जाऊन तेचतेच खाण्यापेक्षा एकमेकांकडे जाऊन नवनवीन पदार्थांचा स्वाद घेतला पाहिजे.

अशा प्रकारची गाणे जोरजोरात ओरडून म्हंटले नाही मनातील द्वेषभावना निघून जातात. एकदा काय  मन मोकळं झालं म्हणजे जीवनाला नवीन दिशा दिसू लागतात.

म्हणून भोंडला ही पद्धत पुढील पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. 

Leave a Comment

Papad Receipes at 1 Place All About Girnar- Datta Destination Chaitra Navratri 2024 चैत्र नवरात्रि 2024 होली क्यों और कैसे मनाएंगे Why and how to celebrate Holi Shivratri/Mahashivratri