नमस्कार मंडळींनो,
श्री गुरुचरित्र अध्याय 4 Shri Guru Charitra Chapter 4 In Marathi
अध्याय चौथा : श्रीगुरू दत्तात्रेयांची जन्मकथा Chapter 4 : Birth story of Sriguru Dattatreya
श्रीगणेशाय नमः।। सिद्धयोगी नामधारकांना दत्तजन्माख्यान सांगू लागले. ते म्हणाले, “वत्स! सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव, त्या हिरण्यगर्भाला ‘ब्रह्मांड’ असेही म्हणतात. त्याची दोन शकले झाली- आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली. दहा दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र (सप्तर्षी) निर्माण केले. अनसूया या अत्रिऋषींच्या पत्नी. त्या महान पतिव्रता होत्या. पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की, त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय, अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, ‘अनसूया पतिभक्त आहेत. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हांला शाप देतील की काय, अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी.
तेव्हा अनसूयांचे सत्त्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुकरूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्या वेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनसूया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले, “आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत.” अनसूयांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. तेव्हा ते म्हणाले, “आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हांला शक्य नाही. म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो.” त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले आणि पात्रे मांडली. तेव्हा ते म्हणाले, “सती! आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे, अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हांला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ.’
तेव्हा – हे ब्राह्मण आपले सत्त्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत- हे अनसूयांच्या लक्षात आले. मग – ‘अतिथी विन्मुख गेले, तर पतींच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे, तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतींच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल’- असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला. त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पाने उचलली व-‘माझ्या पतींची तपश्चर्या श्रेष्ठ असेल, तर हे तीनही अतिथी लहान बालके होतील’ – असे म्हणून बाहेर आल्या. तर काय आश्चर्य! त्या भिक्षुकांची तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकूळ होऊन रडू लागली. अनसूया अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या. मातृसुलभ वात्सल्याने त्यांना पान्हा फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. त्या त्रिदेवांच्या मातोश्री झाल्या! त्यांनी तिघांना न्हाऊ माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले. मध्यान्हसमयी अत्री आश्रमात परतले. तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनसूयांनी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूपखूण जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री व अनसूया यांची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनसूयांशी चर्चा केली व म्हणाले, “हे देवश्रेष्ठींनो! तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा.’ तेव्हा – ‘तथास्तु!’- म्हणून ते तीनही देव स्वस्थानी परतले. अत्रि-अनसूया यांनी त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाले, “आई! मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे. मला निरोप द्या.” चंद्र म्हणाला, “मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील.” श्री गुरुचरित्र अध्याय 4 Shri Guru Charitra Chapter 4
अनसूया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्तरूपाने अत्रिआश्रमी राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्याठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि-अनसूया यांचे पुत्र आणि श्रीविष्णूंचे अवतार असूनही ‘दत्तात्रेय’ म्हणून एकत्वाने राहिले. ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहेत.’ दत्तजन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली. ते सिद्धयोग्यांना म्हणाले, “मुनिवर्य! आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा.”
श्री गुरुचरित्र अध्याय 4 Shri Guru Charitra Chapter 4
श्री गुरुचरित्र अध्याय 3 Shri Guru Charitra Chapter 3
धन्यवाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
1 thought on “श्री गुरुचरित्र अध्याय 4 Shri Guru Charitra Chapter 4”