नमस्कार मंडळींनो,
श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5
अध्याय पाचवा : श्रीपादश्रीवल्लभांची जन्मकथा
श्रीगणेशाय नमः । सिद्ध म्हणाले, “नामधारक! कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले, तेव्हा श्रीगुरू दत्तात्रेयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पीठापूर इथे आपळराज नावाचे आपस्तंब शाखेचे एक ब्राह्मण राहत असत. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या. त्या विष्णुदत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावास्येस आपळराजांच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथिरूपाने त्यांच्या द्वारी आले. सुमतींनी ब्राह्मणभोजनापूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवातत्परता पाहून दत्तात्रेयांनी त्यांना तीन मुखे व सहा हात या ‘मूळ दत्तस्वरूपात’ दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली व म्हणाल्या, “गुरुदेव! तुम्ही मला अतिथिरूपात ‘माते’ अशी हाक मारलीत. ते वचन खरे होवो! मला अनेक अपत्ये झाली, पण ती जन्मतःच मेली. जे दोन पुत्र जगले त्यांत एक आंधळा आहे, तर दुसरा पांगळा! असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद्य, देवांसारखा आणि परम पुरुषार्थी असावा, अशी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा.”
दत्तात्रेय महणाले, “मातोश्री! तुम्हांला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हांला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडलात, तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही.” सुमतींना वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पतींना सांगितले, तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. ते सुमतींना म्हणाले, “दत्तात्रेयांनी तुम्हांला ‘भाते’ अशी हाक मारली, त्याअर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले!” त्या वेळी दोघांचाही आनंद गगनात नव्हता. पण सुमतींच्या मनात थोडी रुखरुख होती. त्या पतींना म्हणाल्या, “नाथ! आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली, यात माझे काही चुकले का?” आपळराज म्हणाले, “अहो, तुम्ही योग्य तेच केलेत. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हांला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. “
त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. ब्राह्मणांनी त्यांचे जातक वर्तवले, म्हणाले, “हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील. यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल.” ते ऐकून आपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्रांचे ‘श्रीपाद’ नाव ठेवले. Shri Guru Charitra Chapter 5
श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर पिताजींनी त्यांची मुंज केली. मौंजीबंधन होताच ते चारही वेद घडाघड म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायश्चित्ते, वेदांचा अर्थ, वेदान्ताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद सोळा वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विवाहाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, “मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी! म्हणून मी ‘श्रीपादश्रीवल्लभ’ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे.” ते ऐकून आपळराज व सुमतींना वाईट वाटले. पण दत्तात्रेयांचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, “बाळ! तुम्ही आमची म्हातारपणीची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात, तर आम्ही कोणाकडे आशेने बघायचे ? तुम्ही आमचे दैन्य दूर कराल, अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे?” Shri Guru Charitra Chapter 5
तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, “आई! बाबा! एवढेच ना! मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो.” मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य! ते दोघेही अव्यंग, सुंदर व सदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही मातापित्यांची सेवा केलीत, तर इहलोकी पुत्र-पौत्रदिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल.” ते सर्व पाहून आपळराज व सुमतींना आनंदाश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले- “हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. याचे वंशज वेदशास्त्रसंपन्न, सदाचारी व प्रतिष्ठाप्राप्त होतील. आता साधुजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे, तरी अनुज्ञा असावी.”
त्या वेळी त्या दोघांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्तरूपाने काशीला आले. तिथून बदिकाश्रमास गेले. श्रीगुरुचरित्र तिथे नारायणांची भेट घेतली. त्यांना ‘मी कार्यासाठी मनुष्यरूपाने अवतार घेतला आहे’- असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्णक्षेत्री आले. Shri Guru Charitra Chapter 5
धन्यवाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5
1 thought on “श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5”