Ashadi Ekadashi 2023: प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. यातील एक शुक्ल पक्ष म्हणजेच अमावस्या नंतर येणारी एकादशी तर दुसरी कृष्ण पक्षात म्हणजेच पौर्णिमें नंतर येणारी एकादशी . याप्रमाणे प्रत्येक वर्षाला 24 किंवा 26 एकादशी तरी येतातच. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात . देवशयनी या शब्दातच त्याचा मूळ अर्थ लपलेला आहे .म्हणजेच देव झोपायला जातात.ते झोपायला का जातात? हे आपण पुढे एका धार्मिक कथे मार्फत समजून घेऊयात. देवी एकादशी कशा उत्पन्न झाल्या हिसुद्धा कथा आपण पाहणार आहोत. तसेच एकादशी का करावी? कशी करावी? हे सुद्धा आपण बघू यात.
मंत्र :
|| जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी ||
|| हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ||
|| विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ॐ विठ्ठला ||
|| पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
बोला तुकाराम महाराज की जय
ज्ञानदेव माऊली महाराज की जय ||
प्रत्येक महिन्याच्या अकराव्या तिथीला एकादशी असतात. एकादशीचं विशेष महत्त्व म्हणजे आहे कि या दिवशी उपवास करतात. असे म्हटले जाते उपवास केल्याने आपलं शरीर आतून स्वच्छ होतं तसंच देवाचे भजन व नाव घेतल्याने मन ही स्वच्छ होतं.आषाढी एकादशीच्या ज्या वेळेस सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागर मध्ये झोपावयास जातात. .मग चार महिन्यानंतर म्हणजेच कार्तिक महिन्यातील एकादशीला जेव्हा सूर्य तुला राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस देव उठणी एकादशी असते. त्यावेळेस भगवंत उठतात. म्हणजेच कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला देव उठणी एकादशी असे म्हणतात. .म्हणूनच हा चार महिन्याचा कालावधी हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो.
आषाढी एकादशी – Ashadi Ekadashi/ Palkhi
महाराष्ट्रात आषाढी एकादशीची जय्यत तयारी करतात. हा एक महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. पंढरपूर मध्ये स्वयम् भगवान विष्णू वास करतात. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या घराण्यात परंपरा होती, पायी चालून पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रूपी श्री हरीचे दर्शन घ्यायचे. महाराष्ट्रातील लहान मोठ्या प्रत्येक गावातून पालख्या काढल्या जातात. व त्या पंधरा दिवस चालत, मिळेल ते खात पीत पंढरपूरला जातात. लाखो लोकांचा मोठा सोहळा असतो पंढरपुरात. देवाचा व भक्ताचा एकमेकांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी.
चंद्रभागेच्या तिरी वसलेले पंढरपूर हे महाराष्ट्रातील स्वर्ग. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून भक्त व पालखी पंढरपूरला पायी चालत जातात. यालाच आषाढी वारी आणि चालणारे भक्त हे वारकरी होय. चंद्रभागेत स्नान करून वारकरी पंढरपूरच्या प्रभुंचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात. स्वतःला पावन करून घेतात.
- शेगाव इथून संत गजानन महाराजांची पालखी,
- आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ,
- देहू इथून संत तुकाराम महाराजांची पालखी,
- त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची पालखी, पैठणहून संत एकनाथांची पालखी तर
- उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी पंढरपूर येतात
पण त्याबरोबर लाखो भक्त सुद्धा येतात किती अविस्मरणीय सोहळा असेल हा याची कल्पना आपण करू शकतो.
आषाढीवारी – Ashadi Vaari / Wari
वारी ही परंपरा साधारणता सातशे-आठशे वर्षापूर्वींची. अतिशय सुंदरपणे सजवलेल्या पालख्या मध्ये संतांच्या पादुका घेऊन भक्त पंढरपुराकडे चालत जाण्याची प्रथा म्हणजेच वारी. साधारणतः 250 किलोमीटरचा हा प्रवास वारकरी, हसत, नाचत,भजन गात, देवाचे स्मरण करत 21 दिवसात पंढरपुरात पोहोचतो. हा प्रवास चालत जाणाऱ्या भक्तांनाच वारकरी असे म्हटले जाते. गळ्यात तुळशीची माळ हातात टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन, झेंडा हे सर्व घेऊन जाण्याची प्रथा आहे. हा प्रसंग अनुभव करण्यात वेगळीच मजा आहे. वेगवेगळ्या गावावरून येणाऱ्या छोट्या छोट्या समूहांना दिंडी असे म्हटले जाते. 21 दिवसांचा खडतर प्रवास, सातत्याने पडणारा पाऊस या सगळ्या अडचणींना हसत, गात, नाचत जाण्याचा प्रवास खूपच विलक्षण असतो.
रिंगण
वारकरी भक्तिरसात इतका गुंतलेला असतो, की त्याला या सर्व अडचणी कळतच नाही. देव बाहेर काढतो. वारीतील महत्त्वाचे आकर्षण असते ते म्हणजे रिंगण. हा म्हणजे एक प्रकारचा खेळ असतो. उभे रिंगण, बकरी रिंगण असे काही रिंगणाचे प्रकार. वारकरी विठोबा च्या नावाचा गजर करत एका सुरात तालात टाळ वाजवत गोल एकसारखे पद्धतीने नाचतो यालाच गोल रिंगण असे म्हणतात. बकरी रिंगणात अक्षरशा बकरी सुद्धा भक्तीभावात एका तालात लीन होऊन नाचताना आपल्याला दिसून येतात. रिंगणानंतर उडीचे खेळ असेही प्रकार असतात. पालखीचा नित्यक्रम हा पूर्वनियोजित असतो. प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांना जेवण तसेच इतर आवश्यक वस्तू देऊन शहरातील लोक लोकसुद्धा थोडाफार पुण्य कमवून घेतात.
विठोबा – रुक्मिणी – Vitthoba-Rukhmini
विठोबा म्हणजेच भगवान विष्णू यांच रूप व रुक्मिणी म्हणजेच माता लक्ष्मी.
भगवंतांच हे नावच किती सुंदर आहे विठोबा म्हणजे विटेवरी उभा असा आपला देव.
विठोबा नाव कसे पडले? व देव का म्हणून विटेवर उभा राहिला? प्रश्न पडतोय ना?
पुंडलिक नावाचा देवाचा एक परमभक्त होता. त्यांनी जन्म घेतला पंढरपुरात म्हणूनच पंढरपूर आज पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं.आई-वडिलांची सेवा करणे व सातत्याने देवाचे नामस्मरण करणे याच्यातच तो परम सुख मानत होता. एका दिवशी बाहेर धोधो पाऊस पडत होता. देवाच्या मनात आलं आपण आज पुंडलिक याला दर्शन देऊ. पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. घराबाहेर पावसामुळे खूप चिखल झाले होते. देव पुंडलिकाच्या दाराबाहेर येऊन त्याला आवाज देतात ये मी बाहेर थांबलो आहे मात्र पुंडलिक म्हणतो बाहेर पडलेल्या विटे वरती उभे राहा. मी माझ्या आई-वडिलांची सेवा करीत आहे. ती पूर्ण रात्र देव कमरेवर हात ठेवून विटेवरी उभे राहतात . मात्र पुंडलिक रात्रभर बाहेर येतच नाही.
गारठ्यामुळे त्याच्या आई-वडिलांना झोप लागत नसते. व तो पूर्ण रात्र पाय दाबत उभा राहतो आणि देव बाहेर वाट बघत उभे राहतात. रात्रभर भगवान विष्णु कुठे आहेत हे बघण्यासाठी देवी लक्ष्मी त्यांच्या मागोमाग भूतलावर येतात बघतात तर काय भगवान विष्णू कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहून आपल्या भक्तांची वाट बघत आहेत त्याही त्यांच्या मागे उभ्या राहतात. सकाळी जेव्हा दार उघडून पुंडलिक बाहेर येतो व बाहेर भगवंत विष्णू यांना असा विटेवरी उभा राहिलेला बघून आश्चर्यचकित होतो आणि साष्टांग नमस्कार घालतो.
पुंडलिकाची भक्ती
पुंडलिकाची भक्ती व आई-वडिलांची सेवा करण्याची वृत्ती हे बघून देव भारावून जातो याच गोष्टीमुळे म्हणतात खऱ्या भक्ताची वाट देव सुद्धा बघतात. त्यावेळी भगवंतांनी पुंडलिक याला वरदान दिले की ते सदैव पंढरपुरात वास करतील आणि जो कोणी भक्त भक्तीभावाने आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करून देवाचे दर्शन घेईल त्याला देव प्रसन्न होतील.कालांतराने त्या ठिकाणी भगवान विष्णू यांचे विठोबा रूपात देऊळ तसेच माता रुक्मिणी व पुंडलिक यांच्याही मुर्त्या बनवून देऊळ बनवण्यात आले. प्रशस्त अशा मंदिराची रचना झाली.म्हणूनच पंढरपुरातील विष्णू यांच्या रूपाला विठोबा असे म्हणतात. आणि माता रुक्मिणी या देवाला बघत मूर्तीचे थोडेसे मागे उभ्या आहेत असे जाणवून येते. म्हणूनच या सोहळ्याला कदाचित भक्त आणि देव यांची भेट असेही म्हणतात.
आषाढी एकादशी 2023: Ashadi ekadashi 2023 date
यावर्षी आषाढी एकादशी गुरुवार, दिनांक 29 जून 2023 रोजी येत आहे. याच दिवशी चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होत आहे.साधारणता चार महिन्यानंतर, कार्तिक एकादशी ला चातुर्मास पूर्ण होत आहे चातुर्मासात खूप लोक आपल्या आवडत्या गोष्टीचं पथ्य पाळतात म्हणजे ती वस्तू ग्रहण करत नाहीत.
26 एकादशी ची नावे: Month wise ekadashi names
- पौष: पुत्रदा एकादशी,सफला एकादशी, पवित्रा एकादशी
- माघ: षट्तिला एकादशी , जया एकादशी
- फाल्गुन: विजया एकादशी, आमलकी एकादशी
- अधिक: पद्मिनी/ कमला /पुरुषोत्तमी/ परमा एकादशी
- चैत्र: पापमोचनी/ कामदा एकादशी
- ज्येष्ठ: अचला /अपरा/ पांडव/ निर्जला/ रुक्मिणीहरण एकादशी
- आषाढ: योगिनी/ देवशयनी/ पद्मनाभ एकादशी
- श्रावण: पुत्रदा/ पवित्रा/ कामिका एकादशी
- भाद्रपद: अजा/ अन्नदा/ परिवर्तनी/ पार्श्व/ वामन एकादशी
- अश्विन: इंदिरा/ पाप नाशिनी एकादशी
- कार्तिक: रमा/ प्रबोधिनी/ देवत्थान एकादशी
- मार्गशीर्ष: उत्पन्ना/ मोक्षदा एकादशी
कथा – Why should we celebrate Ashadi ekadashi
एक मुलगा असतो. तो खूप छान तयार होऊन आपल्या सासरी जायला निघतो. आपल्या बायकोला सासरहून आणण्यासाठी तु खुप उत्सुक असतो. तो जात असताना त्याला एक गाय चिखलामध्ये अडकलेली दिसते गाय त्याला मदतीसाठी विनवणी करते. परंतु त्याला वाटते की आपण गाईची मदत करायला गेलो. तर आपले कपडे खराब होतील मग तो नाही म्हणून पुढे जायला लागतो .जसाच तो पुढे जातो गाय त्याला श्राप देते की,“तुला सासरवाडी ला जायचय ना तु जा पण तिकडे जर तू काही खाल्लं तर तू अर्धा गाढव होशील व आंघोळ केलीस तर पूर्ण गाढव होशील”. तो निघून जातो. सासरवाडीला पोहोचतो पण तिकडे काहीच खात नाही किंवा आंघोळ करत नाही त्याला भीती वाटत असते.
त्याला असं बघून त्याच्या सासरे, सासू,बायको सगळे खूप विचारात पडतात. कोणाला काहीच कळत नसते काय झालं आहे. बायको हळूच त्याला विचारते काय झालं आहे तो रस्त्यात घडलेला प्रकार बायकोला सांगतो. बायको म्हणते घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे तुम्ही निवांत जेवून घ्या व आंघोळ करून घ्या. बायकोच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तो आंघोळ करतो व जेवून घेतो पुढच्या क्षणाला तो पूर्ण गाढव होऊन जातो. घरातल्यांना कळत नाही हा गाढव कुठून आला ते त्याला हाकलायला लागतात तेव्हाच त्याची बायको सगळ्यांना सर्व परिस्थिती खरी खरी सांगून त्याच्याबरोबर पाठवणी करून द्यायला सांगते. त्या गाढवाबरोबर रडत रडतआपल्या मुलीची पाठवणी करतात.
पत्नीप्रेम
बायको गाढवाचं स्वतःपेक्षा जास्त लक्ष देत असते. स्वतः कमवून त्यालाही खाऊ घालत असते. स्वतः वरती चार आणे व गाढव बनलेल्या नवऱ्यावर बारा आणे खर्च करत असते. मनोभावे त्याची सेवा व काळजी घेत असते. राजाची बायको खिडकीतून रोजचा प्रकार बघत असते. राणीला कळत नसते या मुलीला असा काय त्रास आहे कि ती गाढवाचं एवढं लक्ष देत आहे. एकदा राजमहालात तिला बोलवून राणी त्या मुलीला विचारते. तुला कोणत्या गोष्टीचं दुख आहे की तू गाढवाचं एवढं लक्ष देत आहेस मुलगी म्हणते तुम्ही जर माझा त्रास दूर करत असाल तर तर मी तुम्हाला सर्व सत्य सांगते.
राणी तिला वचन देते, की ती तिची निश्चितच मदत करण्याचा प्रयत्न करेन. ती राणीला गाईने दिलेल्या श्राप व घडलेल्या प्रकाराची सर्व सत्यकथा राणी समोर मांडते .राणीला मदतीसाठी विनवणी करते. राणी राज्यातील सर्व मंत्री व पंडित यांच्याशी विचार विमर्श करते. पण कोणालाच पर्याय सापडत नसतो. शेवटी राणी राज्यात घोषणा करते जो कोणी त्या मुलाला गाढवा पासून पुन्हा मनुष्य बनवेल त्याला राजा मालामाल करेल त्याला खूप सोनी नाणी भेटतील. एक आजीबाई समोर येतात व म्हणतात मी आयुष्यभर केलेल्या एकादशी व्रत त्यामधून 24 एकादशी या मुलीला दान केल्या तर हिचा नवरा पुन्हा मनुष्याचे जीवन जगू लागेल व गाईच्या श्रापतून मुक्त होईल.
सर्वांना हे ऐकून आश्चर्य वाटते व कोणी याच्यावर विश्वास ठेवत नाही. पण तरीदेखील कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने राणी देखील आजीबाईंना वचन देते, की जर तू जे म्हणते ते खरं झालं तर मी ही तुला सोनी नाणी देऊन मलामाल करेल. आजीबाई वचन देतात . 24 एकादशी दान करून टाकतात जशास त्या एकादशी दान करण्याचा संकल्प घेतात, त्याच क्षणी तो मुलगा गाढवा पासून पुन्हा मनुष्य रूपात येतो. त्याला गाईच्या शापातून मुक्ती मिळते. हे आहे एकादशीचे महत्त्व. दिलेल्या वचनाप्रमाणे राणी आजीबाईंना सोनी नाणी देऊन खूप सन्मान देते. व त्या दिवशी राणी व राजा राज्यात घोषणा करतात. प्रत्येकांनी 1,2,6,12,24 जशा जमतील तशा एकादशी आपल्या जीवनात अवश्य कराव्यात.
धार्मिक कथा एकादशी – The traditional story of ekadashi
धार्मिक कथेनुसार मुरा नावाचा एक राक्षस होता. त्याने भगवान श्री शिव यांची अखंड आराधना करून देवाला प्रसन्न केले. व त्याचा मृत्यू कोणत्याही देवाचा हातून किंवा राक्षसाच्या हातून होऊ नये असे वरदान घेतले. प्रचंड बळ व शक्तीने त्याने इंद्रदेव, अग्निदेव, चन्द्रदेव, सूर्यदेव इत्यादी सर्व शक्तिशाली देवतांना पराभूत केले. त्यांना स्वर्गातून काढून टाकले. स्वर्गात आपले आधिपत्य स्थापन केले. सर्व देव भयभीत होऊन भगवान विष्णू यांच्याकडे मदतीसाठी गेले. राक्षसाला घाबरून त्रिकूट पर्वतावर आमला झाडाखाली एका गुहेत जाऊन लपले . जेवण नसल्यामुळे उपवास घडून आला.
देवी एकादशी उत्पन्न कथा
भगवान विष्णू व मुरा राक्षस यांच्यामध्ये अनेक वर्ष युद्ध झाले .परंतु भगवान शिव यांच्या वरदानामुळे युद्धाचा काहीही परिणाम समोर येत नव्हता. ज्यावेळी भगवंत नामस्मरणात मग्न होते. संधीचा फायदा उचलून राक्षसाने त्यांच्यावर प्रहार करून त्यांना मारण्याचा कट रचला. ज्यावेळी मुरा भगवंतांवर प्रहार करण्यासाठी पुढे गेला. त्याच वेळी एक देवी उत्पन्न झाली . तीने राक्षसाचा अंत केला. याच देवीचे नाव एकादशी असे होते . इंद्र आदिदेवता गुफेत असल्यामुळे त्यांचा उपवास घडून येतो. म्हणून भगवंतांनी देवी एकादशीला हा वरदान दिला . जो कोणी भक्त मनोभावे एकादशी ची पूजा व उपवास करतील व भगवंताचे नामस्मरण करतील. ते भक्त भगवंतांना अतिप्रिय असतील म्हणून एकादशीला उपवास करणे,. भगवंताचे नामस्मरण करण्याची प्रथा प्रचलित झाली आहे.
एकादशीला वर्ज असणाऱ्या वस्तू :
धर्मानुसार एकादशीला कोणतेही अन्न ग्रहण करू नये.
काही ठिकाणी दूध पण पीत नाही.
कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये.
एकादशी कशी करावी How to Celebrate Ashadi Ekadashi ?
- सकाळी लवकर उठून व कार्य उरकून स्वच्छ आंघोळ करावी.
- मनोभावे भगवंतांची पूजा मांडावी .
- आरती व नामस्मरण करावे उपवास करावा.
- शक्य असल्यास उपवास फक्त फळं खाऊन करावा.
महत्व – Importance of Ashadi Ekadashi
- धार्मिक मान्यतेनुसार एकादशीला कोणतेही व्यसन न करता मनोभावे उपवास केला.
- भगवंतांचे नामस्मरण केले तर पाप नष्ट होऊन खूप पुण्य मिळते . मोक्षाची प्राप्ती होते.
- प्रत्येक महिन्याच्या अकराव्या तिथीला एकादशी असते..
- एकादशीचा विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास करतात.
- उपवास केल्याने आपलं शरीर आतून स्वच्छ होतं तसंच देवाचे भजन व नाव घेतल्याने मन ही स्वच्छ होतं.
Very nice and informative..?????????
तुम्ही दिलेल्या कमेंट्स मुळे लिहायला उत्साह येतो. हा लेख वाचून स्वतःचा वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.
Good,informative blog.easy and simple language to understand.
तुम्ही दिलेल्या कमेंट्स मुळे लिहायला उत्साह येतो. हा लेख वाचून स्वतःचा वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.
अध्यात्मात पाऊल ठेवला आहे, याचे हेच प्रमाण आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. अध्यत्मातूनच जीवन जगण्याची दिशा मिळते, ही अनुभूती येईल. ओम शांती.
तुम्ही दिलेल्या कमेंट्स मुळे लिहायला उत्साह येतो. हा लेख वाचून स्वतःचा वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chan post ahe, sadhya saral ani sopya bhashet sagla samzavla ahe!
????
तुम्ही दिलेल्या कमेंट्स मुळे लिहायला उत्साह येतो. हा लेख वाचून स्वतःचा वेळ देऊन कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.
Very informative 👌🏻🙏🏻