नमस्कार मंडळींनो,
श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6 In Marathi
अध्याय सहावा : गोकर्णमहाबळेश्वरांची कथा
श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक म्हणाले, “महाराज! श्रीपादश्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले ?” सिद्ध म्हणाले, “शिष्योत्तम! दत्तात्रेयांचा ‘श्रीपाद’ अवतार भक्तांना उपदेश करून, त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन, त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपादश्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते..
तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे माहात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंगरूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग ‘महाबळेश्वर’ नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे-
कैकसी या रावणांच्या मातोश्री त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणांना कमीपणा वाटला. ‘माताजी! मी तुम्हाला शिवजींसह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या वीस हातांनी तो पर्वत गदगदा हालवू लागले! त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले, पार्वती भयभीत झाल्या. तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण त्या पर्वताखाली दडपले गेले. त्यांनी आर्ततेने शंकरांची प्रार्थना केली. ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली. त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून घेताच दशाननांची सुटका झाली. तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणांनी आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्याच्या साथीने छत्तीस राग-रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी मातोश्रींसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा ते म्हणाले, “माझ्या पूजेसाठी मी तुम्हांला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. “त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, “हे लंकेत घेऊन जा. याची तीन वर्षे पूजा करा. त्यामुळे तुम्ही ईश्वरस्वरूप व्हाल. मात्र मार्गाने जाता हे दिव्य लिंग कुठेही भूमीवर ठेवू नका.” शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणांना खूपच आनंद झाला होता. त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले. ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूंची भेट घेतली व म्हणाले, “श्रीहरी ! शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे.” श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6
–
तेव्हा श्रीविष्णूंनी शंकरांना गाठले व रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला, ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची, ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूंचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, “दशानन! सायंसंध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणांनी संध्येची वेळ शक्यतो मोडू नये.” त्यांचा निरोप घेऊन ते संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल’ हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले. ते गणपती होते. ‘हे ब्राह्मणकुमार भोळे दिसत आहेत. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग यांच्याकडे सांभाळायला देऊ’- असा विचार करून रावणांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले व त्यांना मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटुरूपातील गणपती म्हणाले, “लंकेश्वर! तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही, तर मी तुम्हांला तीन हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत, तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन.” ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले व ते संध्येसाठी गेले. बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते. रावण अर्घ्य देत असताना त्यांनी त्यांना हाक मारली. रावणांनी हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितले. मग त्यांनी थोड्या-थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या. त्यानंतर गणपतींनी स्वतः च्या पिताजींचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले! तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पृष्पवृष्टी केली. श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6
संध्या आटोपून रावण त्वरेने धावले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवप्रभू लिंगरूपाने तिथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग ‘गोकर्णमहाबळेश्वर’ म्हणून प्रख्यात झाले. श्रीगुरुचरित्र हताश रावण रिक्तहस्ते लंकेत परतले. शिवजींनी वास्तव्य केले म्हणून देवही तिथे येऊन राहू लागले. “”
श्री गुरुचरित्र अध्याय 6 Shri Guru Charitra Chapter 6
श्री गुरुचरित्र अध्याय 5 Shri Guru Charitra Chapter 5
Elevate Your Digital Experience
धन्यवाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा